शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या, फिडर पीलर, वितरण रोहीत्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीज पुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आगी लागण्याचे प्रकारही वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरांतर्गत कोसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत अशीच एका कचरा जाळण्याच्या घटनेमुळे आग लागून महावितरण वीज यंत्रणेचे जळून नुकसान झाले होते. ग्राहकांनाही काही काळ वीज पुरवठ्याशिवाय राहावे लागले होते. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी कचरा टाकू नये, किंवा अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्यास १९१२, १९१२०, १८००१०२३४३५, १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना देण्याचे आवाहन महावितरणकडून केले आहे.
बॉक्स
शॉर्टसर्किटचाही धोका
घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने तसेच घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्टसर्किट होण्याची शक्यता आहे. न चुकून आग लागल्यास घरातील मेन स्विच बंद करावा, पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.