पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील नेरी येथील बंडूजी गोविंदराव फटिंग यांची मुलगी शुभांगी मिलिंद राऊत यांनी आपल्या वडिलांच्या बँकेतील खात्यावरून स्वत:च्या खात्यावर आरटीजीएसद्वारे आठ लाख रुपये वळते करून फसवणूक केल्याची माहिती दिव्यांग असलेले बंडूजी गोविंदराव फटिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बंडूजी गोविंदराव फटिंग यांची मुलगी शुभांगी हिने मागील वर्षी २०११ मध्ये आंतरजातीय विवाह केला. शुभांगीचे आई-वडील वयोवृद्ध असून, वडील बंडूजी विकलांग आहेत. वडील अर्धांगवायूच्या आजाराने तर आई ब्रेनट्युमरने ग्रस्त आहे. त्यांनी उमरेडजवळील कोटगाव येथे असलेली शेतजमीन औषधोपचारासाठी विकली होती. त्यातून मिळालेल्या रकमेपैकी आठ लाख रुपये बंडूजी फटिंग यांनी नेरी येथील शाखेच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर ठेवले होते. मात्र, आई-वडिलांची तब्बेत ठीक राहत नसल्यामुळे शुभांगी मिलिंद राऊत हिने त्यांना आपल्याकडे चिमूर येथे बोलाविले व त्यांचे येथेच खाते उघडून नेरी शाखेतील रक्कम टाकण्याकरिता काही दस्ताऐवजांवर वडिलांची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर शुभांगी हिने या दस्ताऐवजांचा दुरूपयोग करत स्वतःच्या खात्यात आरटीजीएस प्रणालीद्वारे वडिलांच्या खात्यातील आठ लाख रुपये वळते केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैशांबाबत वडील बंडूजी यांनी शुभांगी हिला विचारणा केली असता शुभांगीने पैसे देण्यास नकार दिला.
चिमूर पोलिसांत तक्रार
याबाबत बंडूजी यांनी २४ मार्च २०२२ ला चिमूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. चिमूर पोलीस न्याय मिळवून देतील, अशी त्यांना अपेक्षा होती. चिमूर पोलीस प्रशासनाकडून उलट आम्हालाच चार दिवसांनी या, आता कर्मचारी नाही, आता वेळ नाही, असे कोणत्या ना कोणत्या कारणाने टाळत नेले. यामुळे नाईलाजाने आम्हाला प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे करावी लागली, अशी माहितीही बंडूजी फटिंग यांंनी पत्रकार परिषदेत दिली. आठ दिवसांत न्याय मिळवून दिला नाही तर आम्ही दोघे पती-पत्नी आत्मदहन करू, असा इशारा यावेळी फटिंग दाम्पत्याने दिला आहे.
तक्रारकर्त्यांनी तक्रार अर्ज चिमूर पोलीस ठाण्यात केला आहे. त्या आधारावर चौकशी केली असता वडिलांनी स्वत: मुलीकडे राहत असताना मुलीला पैसे आरटीजीएस करून दिले, असे बँकेत चौकशीअंती समोर आले. हा कौटुंबिक वाद आहे. मुलीचे भावाशी पटत नसल्याने दोघेही एकमेकांविरुद्ध तक्रारी देण्यासाठी आले होते. सदर प्रकरण चौकशीत आहे.
मनोज गभने, पोलीस निरीक्षक, चिमूर