लखमापूर : फटाक्यांची आतषबाजी करीत सर्वत्र दिवाळी मोठ्या थाटात साजरी केली जात आहे. मात्र कोरपना तालुक्यातील बिबी येथील युवकांनी ग्राम स्वच्छता करून दिवाळी साजरी केली आहे. येथील सेवार्थ ग्रुप व साई स्पोटिंग क्लबच्या युवकांनी हा उपक्रम राबविला आहे.लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी गावातील मुख्य रस्ता तसेच वॉर्डातील रस्त्याची स्वच्छता केली. कचऱ्याची विल्हेवाट कचरापेटीतच करावी, असे फलक लावण्यात आले. त्याचबरोबर वॉर्डातील नाल्या स्वच्छ करण्यात आल्या. यात गावातील तरुणांचा मोठा सहभाग होता. बिबी येथील समाजसेवक गिरीधर काळे, पोलीस खात्यात नियुक्ती झालेले प्रशांत देरकर, सतीश पाचभाई, पंकज बुजाडे, रूपेश टोंगे, सुरेश टेकाम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभाला ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सरपंच इंदिरा कोडापे, उपसरपंच संतोषकुमार पावडे, डॉ. गजानन काकडे, किन्नाके महाराज, ह.भ.प. पेटकर महाराज, प्रा. देवराव ठावरी, वासुदेव बेसुरवार, शंकर आस्वले, तमु अहमद नामदेव ढवस आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गावोगावी दिवाळी साजरी केली जात आहे. परंतु आपल्या गरीब शेतकऱ्याचीही दिवाळी साजरी व्हावी, यासाठी प्रत्येकाने मदत करण्याची गरज असल्याचे मत यावेळी ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात महिलांसाठी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम स्वाती कोडापे, द्वितीय गणपत तुमाने, तृतीय सुनंदा मरस्कोल्हे, प्रोत्साहनपर गुड्डू आत्राम व सोनाली कोडापे यांनी बक्षीस मिळविले.पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमामपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नाकर चटप यांनी केले. संचालन कवी अविनाश पोईनकर तर आभार गुड्डू काकडे यांनी मानले. यावेळी सेवार्थ व साई स्पोर्टिंग क्लबचे सदस्य उमेश सपाट, संतोष कोडापे, विठ्ठल अहिरकर, ईराण तुमाने, विशाल आदेकर, नीलेश पानघाटे यांनी ग्रामस्वच्छता केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
दिवाळीच्या दिवशी युवकांनी केली ग्रामस्वच्छता
By admin | Published: October 25, 2014 10:37 PM