चंद्रपूर : ग्रामस्थांनी ठरवले तर काहीही अशक्य नाही. यासाठी फक्त दिशा देण्याची गरज असते. अशीच दिशा देण्याचा प्रयोग राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक जे. टी. पोटे यांनी शाळेत राबविला आणि बघता बघता ग्रामस्थांनी चक्क दोन एकर परिसरातील झाडे-झुडपे असलेला शाळा परिसर स्वच्छ केला. यामध्ये महिला पालकांनीही हिरीरीनी सहभाग घेत मुलांच्या सुरक्षेसाठी गावातील शाळा चकचकीत केली.
पोंभुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा परिसर बराच मोठा आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे या परिसरात आणखीच झाडे-झुडपे वाढली. मुख्याध्यापक तसेच सहशिक्षकांनी आपल्या परीने प्रयत्न केले. मात्र, परिसर अधिक असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. त्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांना बोलावून शाळा परिसर स्वच्छतेसाठी एक दिवस श्रमदान करण्याची विनंती केली. मुख्याध्यापकांनी विनंती केल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी श्रमदान करण्याचे ठरविले. यामध्ये महिला पालकांनीही सहभाग घेत हातात फावडे, टोपले घेत शाळा परिसर स्वच्छ केला.
बालकांची सुरक्षा महत्त्वाची
शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. पर्यावरण अभ्यासाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
मजुरी बुडवून सहभागी झाले पालक
गावातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करतात. मात्र, मुख्याध्यापकांनी विनंती केल्यामुळे काही पालकांनी आपली एक दिवसाची मजुरी तर काहींनी शेतातील काम बुडवून शाळा स्वच्छतेच्या कामात हातभार लावला. मजुरी तर रोजचीच आहे. मात्र, गावातील शाळाही महत्त्वाची असल्याचे पालकांनी सांगितले.