घुग्घुस (चंद्रपूर) : येथील रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या न्यू सायडिंगवर उभ्या मालवाहू रेल्वेगाडीच्या इंजिनवर मंगळवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हा बिबट्या इंजिनवर उडी मारत असताना हायटेंशन इलेक्ट्रिकचा करंट लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी कोळसा खाली करून दुर्गापूर थर्मल पॉवर स्टेशन येथून घुग्घुसच्या न्यू रेल्वे सायडिंगवर मालवाहू रेल्वे आली. चालकाने तिथेच उभी केली. मंगळवारी सकाळी ६ च्या दरम्यान अचानक बिबट्या रेल्वे इंजिनवर मृतावस्थेत आढळून आला. बिबट्या मृतावस्थेत असल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची एकच गर्दी जमली.
या घटनेची माहिती घुग्घुस पोलिस स्टेशन येथे देण्यात आली. पोलिस निरीक्षक आसिफ शेख हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मोक्का चौकशी केली.वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. रेल्वे इंजिनवर मृतावस्थेत असलेला बिबट्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. हा बिबट्या इंजिनवर उडी मारत असताना हायटेंशन इलेक्ट्रिकचा करंट लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे कळणार आहे. पुढील तपास वनविभाग करीत आहे.