चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व मनपा नगरसेवक नंदू नागरकर हे शुक्रवारी सकाळी ९ वाजता आझाद गार्डन परिसरात फिरायला गेले असता त्यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी प्राणघातक हल्ला चढविला. त्यांना बॅट आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली.
या घटनेत नंदू नागरकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या पायाला टाके मारावे लागले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव बंटी नागरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
नंदू नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या युवकांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्यामुळे त्यांची ओळख मात्र पटली नाही. शनिवारी चंद्रपुरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नंदू नागरकर यांच्यावर झालेला हल्ला राजकीय स्वरूपाचा तर नसेल ना अशी चर्चा चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नगरकर हे चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते सोबतच महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पक्षाची भूमिका वठवत आले आहे.नेहमीप्रमाणे ते आज सकाळी फिरायला गेले होते. आपल्या नेहमीच्या मित्रांसोबत चहा घेतल्यानंतर ते घराकडे परत जातांना काही अज्ञात तरुणांनी दुचाकीने त्यांची वाट अडवली. त्यांच्यासोबत हुज्जत घातली. अशातच दोन तरुणांनी मागाहून हॉकी स्टिक आणि बॅट घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.