आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: तीन वर्षांपासून बंद असलेल्या पल्पमिलच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना पाईपचे झाकण अचानक गतीने उसळले. दरम्यान, त्यात साचून असलेला क्लोरीन मिश्रित स्लज मोठ्या प्रमाणावर अंगावर पडल्याने त्याखाली दबून एका कंत्राटी कामगाराचा होरपळून जागीच मृत्यू झाला. अन्य तीन कंत्राटी कामगार जखमी झाले. ही घटना बल्लारपूर येथील बिल्ट ग्रॉफिक्स पेपर प्रा. लि. कंपनीत बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.शेरू ऊर्फ शरीफ अहमद शफीक अहमद (३१) रा. दादाजी नौरोजीभाई वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. फारूख अहमद (३३), व्यंकटेश बुट्टी व रामकुमार जंगली प्रसाद (४६) तिघेही रा. बल्लारपूर यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना चंद्रपूर येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात हलविले आहे.शेरूचा मृतदेह पेपरमिलच्या रुग्णालयात हलविला असता नातेवाईक व कामगारांनी एकच गर्दी केली होती. बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभेचे कार्याध्यक्ष तारासिंग कलशी, महासचिव वसंत मांढरे, विरेंद्र आर्य, रामदास वाग्दरकर यांनी मृतकाचे नातेवाईक व व्यवस्थापनाशी तडजोड करून एका नातेवाईकाला कंत्राटी नोकरी व १२ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाईपोटी देण्याचे मान्य केले. त्यानंतर शेरूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला. कामगारांनी रुग्णालयात एकच गर्दी केल्यामुळे पेपरमिल व्यवस्थापन चांगलेच धास्तावले होते. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. वाय. मलिक ताफ्यासह पेपरमिल रुग्णालय परिसरात दाखल झाले होते. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर करीत आहेत.बिल्ट ग्रॉफिक्स पेपर प्रा. लि. कंपनीत कागदाचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीत सकाळपाळीमध्ये चारही कंत्राटी कामगार पल्पमिलच्या पाईपलाईनची दुरुस्ती करीत होते. पाईपचे झाकण घट्ट बसल्याने ते गॅस कटरच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करीत होते. अशातच काहीही कळायच्या आत गतीने पाईपचे झाकण उघडले गेले. त्या पाईपमध्ये साचून असलेला क्लोरीन मिश्रित स्लजचा मलबा बाहेर फेकल्या गेला. तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर तो मलबा पडला. त्याखाली दबून शेरू ऊर्फ शरीफ अहमद शफीक अहमद या कंत्राटी कामगाराचा जागीच होरपळून मृत्यू झाला.अन्य तिघा कामगारांनी प्रसंगवधान साधून तेथून पळ काढल्याने ते जखमी झाले.
बल्लारपूरमध्ये क्लोरीनमिश्रित स्लजमध्ये दबून कंत्राटी कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:24 AM
तीन वर्षांपासून बंद असलेल्या पल्पमिलच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना पाईपचे झाकण अचानक गतीने उसळले. दरम्यान, त्यात साचून असलेला क्लोरीन मिश्रित स्लज मोठ्या प्रमाणावर अंगावर पडल्याने त्याखाली दबून एका कंत्राटी कामगाराचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
ठळक मुद्देतीन कामगार जखमी