चंद्रपूर : वनविभाग चंद्रपूर परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र दुर्गापूर नियतक्षेत्र पायली भटाळी कक्ष क्र. ८८१ मध्ये मंगळवारी (दि. ६) सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास वनकर्मचारी गस्त घालताना एक वाघीण मृतावस्थेत आढळली. ही वाघीण सुमारे १० वर्षांची असावी. वृद्धापकाळ आणि कार्डीयाक अरेस्टने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
वनविभाग चंद्रपूर परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र दुर्गापूर नियतक्षेत्र पायली भटाळी कक्षात वनकर्मचारी गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना एक वाघीण मृतावस्थेत आढळली. वन कर्मचाऱ्यांनी ही माहिती चंद्रपूर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे सदस्य व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या प्रतिनिधीला दिली. त्यानंतर सर्वांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघिणीचे संपूर्ण अवयव व नखे, दात, मिश्या इत्यादी सुरक्षित आढळले.
मृत वाघिणीला प्राथमिक उपचार केंद्रात (टीटीसी) हलविण्यात आले. एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी शवपरीक्षा केली. यावेळी बंडू धोतरे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे सदस्य मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी, सहायक वनसंरक्षक (तेंदू) एन. जे. चौरे, चंद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) राहुल कारेकार व कर्मचाऱ्यांसमक्ष एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्राथमिक उपचार केंद्रातच वाघिणीचे दहन करण्यात आले.
वाघिणीचे नमुने उत्तरीय तपासणीसाठी रासायनिक विश्लेषक, उपसंचालक, पशुन्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती चंद्रपूर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली.