चंद्रपूर : वरोरा शहरातील मालवीय वार्डामध्ये नगरपरिषद वरोराद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. दूषित पाणी प्याल्याने एका बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिक करीत आहे. बालकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करावी, या मागणीकरिता शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास वरोरा येथील नागरिक वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून भर पावसात आंदोलन सुरू केले आहे.
४ जुलै रोजी नगरपरिषद वरोराद्वारे मानवीय प्रभागात पाणीपुरवठा करण्यात आला. ते पाणी प्याल्याने मालवीय प्रभागातील सुभाष पांढरे यांच्या कुटुंबासह अनेकांना अतिसाराची लागण झाली होती. पूर्वेस सुभाष वांढरे (१०) या मुलाचा उपचारादरम्यान 5 जुलै रोजी मृत्यू झाला. दूषित पाणी सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वरोरा शहरातील नागरिकांना अस्वच्छ पाणीपुरवठा करणाऱ्या विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला काळ्या यादीत टाकावे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत बालकाच्या कुटुंबीयास आर्थिक मोबदला देण्यात यावा. याबाबत वैभव डहाणे यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनास निवेदन दिले होते. मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. पालिकेने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने वैभव डहाणे यांनी वरोरा येथील तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. घटनास्थळी तहसीलदार आल्याची माहिती आहे.