नागभीड (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या बफर क्षेत्रात काहीच दिवसांपूर्वी तीन दिवसांच्या फरकाने सहा वाघांचामृत्यू झाला. बुधवारी दुपारी त्यात आणखी एकाची भर पडली. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड वनपरिक्षेत्रातील चिंधीचक जंगलातील हुमा (किटाळी) बिट क्रमांक ६४६ मध्ये ही घटना उघडकीस आली. दोन वाघांच्या झुंजीत या नर वाघाचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. हा वाघ सुमारे अडीच वर्षांचा होता.
घटनेची माहिती मिळताच नागभीड वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. वाघाच्या मृतदेहावर मागील बाजूला व गळ्याला गंभीर जखम झाल्याने हा वाघ ठार झाल्याचे पंचनाम्यात दिसून येते. सकाळी दोन नर वाघांमध्ये झुंज झाली असावी. यामध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. ही झुंज सकाळी झाली असावी, असे वाघाच्या मृतदेहावरून दिसून येते, असे वनविभागाचे म्हणणे आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू; वनविभागात खळबळ
ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक धोडने, नागभीडचे वनपरिक्षेत्राधिकारी हजारे, ब्रह्मपुरीचे गायकवाड, एनटीसीएचे बंडू धोत्रे, विवेक करंबेकर, पशुसंवर्धन विकास अधिकारी, झेडपीचे अध्यक्ष व त्यांची टीम यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास वनविभाग करीत आहेत.