लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी बिटात मंगळवारी आढळलेल्या दोन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा रविवारी रात्री येथील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला. एकाच दिवशी जखमी वाघ आणि बछड्याचा मृत्यू झाल्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये नैराश्य पसरले आहे.तळोधी वनपरिक्षेत्रातील गट क्रमांक १७४ (गंगासागर हेटी) मध्ये वाघाचा एक मादी बछडा उपाशी व अशक्त अवस्थेत मंगळवारी आढळून आला होता. तेव्हापासून वनकर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस वनकर्मचाऱ्यांनी बछड्याला तिथेच ठेवून वाघिणीची वाट बघितली. मात्र ती न आल्याने गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास बछड्याला चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले. येथे आवश्यकतेनुसार पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.एस. दामले, डॉ. निलेश खलाटे, डॉ. कुंदन पोडचलवार, डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्याकडून बछड्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र बछड्याचा प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.बछड्याचे शवविच्छेदन करून शरिराचे काही अवयव उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली. यावेळी विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) बी.पी. ब्राम्हणे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:29 PM
ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी बिटात मंगळवारी आढळलेल्या दोन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा रविवारी रात्री येथील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला.
ठळक मुद्देचार दिवसांपासून सुरू होता उपचार