लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोराना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र लसीकरणासंदर्भात ग्रामीण तसेच दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात अफवा असल्यामुळे बहुतांशजण लसीकरण करण्याकडे पाठ फिरवित आहे. दरम्यान, टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही तालुक्यांत अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांसह काही शहरी भागामध्येही लसीकरणाबाबत बऱ्याच अफवा आहे. अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांमध्येच अधिक प्रमाणात तर्कवितर्क काढले जात असल्याचे चित्र आहे. विशेषत: लसीकरणानंतर मृत्यू होताे, निपुत्रिक होते, नपुंसकता येत असल्याच्याही मोठ्या प्रमाणात अफवा आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विशेषत: जिवतीमध्ये सर्वात कमी लसीकरण झाले असून सर्वाधिक लसीकरण भद्रावती तालुक्यात झाले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय स्तरावर ग्रामीण भागात जनजाजगृती केली जात आहे. मात्र दुर्गम भागात जनजागृतीची गरज आहे.
काय आहेत अफवा...
नपुंसकता कोरोना संकट डोक्यावर असतानाही काही नागरिकांमध्ये लसीकरणामुळे नपुंसकता येईल, अशी भीती आहे. विशेषत: गावा-गावात यावर उघडपणे तरुणांमध्ये चर्चाही होताना दिसून येत आहे.
अकाली मृत्यूकोरोना लस घेतल्यामुळे अकाली मृत्यू होतो, ही अफवाही मोठ्या प्रमाणात पसरविली जात आहे. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर लावायचे, मात्र लस घ्यायची नाही, असा पवित्राही गावातील अनेकांनी घेतला आहे.
निपुत्रिकाची भीतीलसीकरणामुळे निपुत्रिक होण्याची भीती अनेकांना आहे, अशी अफवाही गावा-गावात पसरविली जात आहे. विशेषत: सुशिक्षितांमध्येही याबाबत सावधता बाळगली जात आहे. विवाहइच्छुक तरुण, तरुणी तसेच ज्यांचे नुकतेच विवाह झाले आहेत, असेही काही जण लसीकरण करण्यासाठी उदासीन आहे. शहरामध्येही यासंदर्भात सध्या चर्चांना वेग आला आहे.