चंद्रपूर (ब्रम्हपुरी) : पोहनपार येथील शालू मोरेश्वर डोंगरवार (30) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाली. पण हा हल्ला नेमका वाघानं केला की बिबट्यानं हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. वनविभागाच्या माहितीनुसार, पोहणपार येथील शालू ग्रामपंचायतच्या मागे शौचास गेली असता बिबट्याच्या हल्ल्या तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गावातील नागरिक व वनविभागाचे दक्षिण वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नायगमकर यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेला.
पोहनपार हे गाव ब्रह्मपुरीपासून सुमारे 25 किमीवर आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी 28 नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा जि. प. सदस्य राजेश कांबळे यांनी दिला आहे. त्यांनी गावाला भेट दिली. आता ते ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात लवकर पोस्टमार्टेम व्हावे म्हणून आले आहे. मृतक शालूच्या मागे दोन लहान मुले, एक बहीण आणि पती असा परिवार आहे. तिच कुटुंबाचा आधार होती. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वनविभाग घटना झालेल्या परिसरात कठडे लावत आहे.