तणाव : आर्थिक मदतीची मागणीवरोरा : शेतातील विद्युत खांबावर वीज दुरूस्तीचे काम करीत असताना आज बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शॉक लागल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना वरोरा तालुक्याील चारगाव (बु) येथे घडली. मृताच्या परिवारास आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने काही काळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.चारगाव (बु) येथील देवीदास वायुदुळे यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने तो दुरूस्त करण्याकरिता श्रीकांत पंढरी चौधरी (२२) रा. चारगाव (बु) हा खांबावर चढला व वीज पुरवठा दुरस्त करीत होता. मात्र अचानक विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मृताच्या परिवारास आर्थिक मदत मिळाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, राजु चिकटे, विठ्ठल तुराणकर आदींनी घेतल्याने काही काळ तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी दाखल झाले. मृताच्या परिवारासोबत चर्चा केल्यानंतर परिवारास आर्थिक मदत देण्यात आली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू
By admin | Published: July 16, 2015 1:18 AM