लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळा सुरू करणे कठीण आहे. शाळा सुरू करण्यासाठी आधी अभ्यासक्रम कमी करणे गरजेचे आहे. नंतरच शाळा कधी सुरु करायच्या याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशा शब्दात माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेतून शासनाच्या शाळा सुरू करण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेत येण्याकरिता बससेवा सुरू नाही. पालक दुचाकी, चारचाकी वा सायकलने मुलांना कसे सोडतील, हा प्रश्नच आहे. शेतीचा हंगाम सुरू आहे. पालक आधी शेतीचाच विचार करेल. विशेषत: मुलींना तर पालक शाळेत पाठवणारच नाही. हा विचार शासनाने केलेला दिसत नाही, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.
शाळेत एका बेंचवर १ विद्यार्थी बसवायचा. बेंचमधले अंतर तीन फूट ठेवायचे व प्रत्येक वर्ग ३० विद्यार्थ्यांचा असेल, असे शासनाचे म्हणणे आहे. परंतु एकाच वर्गातील अन्य विद्यार्थ्यांना कसे शिकवणार? शिक्षकांची संख्याही पुरेशी नाही. मग शाळा कशा चालवायच्या? १५, १६ व १७ वर्षांची मुले ही खोडकर असतात. त्यांना दूर दूर बसवले तरी ते एकत्र येणार, याची जबाबदारी कुणी घ्यायची? संस्थातालकही गोंधळात पडले आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्या म्हणाल्या.
सीबीएसई व प्रगतशील स्टन्ॅडर्ड शाळांमध्ये २५ टक्के दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना शिक्षणाची अट आहे. ही मुले श्रीमंतांच्या मुलांबरोबर शिकतात. त्यांना आॅनलाईन शिक्षण द्यायचे तर स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब लागल्यास त्या मुलांच्या पालकांकडे एवढा पैसा नाही. ही सेवा शासन पुरवणार का? चंद्रपूर जिल्ह्यात अशी १० हजार मुले असल्याचेही फडणवीस म्हणाल्या. यावेळी बलराम डोडाणी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.