चंद्रपूर : पाच दिवसांचा आठवडा, नवृत्तीचे वय ६0 वर्षे, महिला कर्मचार्यांना केंद्राप्रमाणे बालसंगोपन रजा व रिक्तपदे भरणे आदी निर्णय शासन लवकरच घेणार असून आगाऊ वेतनवाढ व कालबद्ध पदोन्नती हे दोन निर्णय झाले आहेत. लवकरच शासन निर्णय निर्गमित होतील. अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक ग दि. कुलथे यांनी महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या सभेत दिली.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रविण बडकेलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद रक्षमवार, अरुण तिखे, अविनाश सोमनाथे, वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी, डॉ. वासुदेव किंमतकर उपस्थित होते. यावेळी प्रविण बडकेलवार, अरुण तिखे, डॉ. वासुदेव किंमतकर यांचा सेवानवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
कुलथे म्हणाले, प्रशासन आणि संघटनांची विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून बहुतांश मागण्या मान्य होण्याच्या वाटेवर आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर या संबंधीचा शासननिर्णय निघेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यभरात अ,ब,क,ड वर्गाची एक लाख ३२ हजार पदे रिक्त असून पदभरतीची प्रक्रिया शासनाने सुरु केलेली आहे. तसेच अधिकारी, कर्मचार्यांना पदोन्नती देणेही सुरु झाले आहे. शासन व संघटनेमध्ये १२ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली.
त्याअनुषंगाने आगाऊ वेतनवाढ व कालबद्ध पदोन्नतीचा शासननिर्णय काढण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर असताना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अधिकारी, कर्मचार्यांना संरक्षण देणार्या कायद्याचा मसुदा गृहविभागाने तयार केला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. पोंभुर्णा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)