- राजकुमार चुनारकर ।चिमूर (चंद्रपूर) : मोठा गाजावाजा करीत चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतर गावागावांत अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. चिमूर तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीच्या वहाणगावातील नागरिक गावातील अवैध दारूविक्रीने त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी-निवेदने देऊनही स्थिती ‘जैसे थे’च रहात असल्याने सरपंच व गावक-यांनी ग्रामपंचायतीमार्फतच दारूविक्रीचा निर्णय घेत शनिवारी झालेल्या ग्रामसभेत हा ठराव एकमताने मंजूर केला. दारूविक्री सात दिवसांत बंद करण्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रशासनाला दिले होते. मात्र उपसरपंच प्रशांत कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत दारूविक्रीबाबत जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागावी व ग्रामपंचायतमध्येच दारूविक्री करावी, अशा आशयाचा ठराव घेण्यात आला. अनेक पुरुष आणि महिलांनी यावेळी मते मांडली.गावाच्या मागणीवरुन येथे दोन कर्मचारी ठेवून पोलीस चौकी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ग्रामसभेच्या अनुषंगाने ग्रामपंचायतने दारूविक्री केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.- एस.के. बारसे, ठाणेदार,शेगाव पोलीस स्टेशन
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामसभेत दारुविक्रीचा ठराव, अवैध दारूविक्रीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 2:09 AM