गेवरा : यावर्षी मान्सूनने दगा दिल्याने शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने तालुक्यातील शेतकऱ्याची परिस्थिती पाहुजाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी सावली तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण चन्नावार यांनी केली आहे.दरवर्षी होणारी नापिकी व यावर्षी विपरित परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता नसलेल्या या तालुक्यातील धानपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना पुरेशा आर्थिक मदतीशिवाय सरसकट दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आव आणणाऱ्या विद्यमान सत्ता पक्षातील सरकारने कोणतेही निकष न लावता दुष्काळग्रस्त तालुका घोषित करावा, अशीही मागणी केली आहे.तालुक्यातील अत्यल्प पावसाचा फटका बसलेला व आसोला मेंढा तलावाच्या निभक्षेत्रातील धान पट्टा व वाघोली बुटी परिसरातील धान पट्टा सोडल्यास इतर स्थानिक तलाव बोड्यांच्या आधारावर शेती करणारा शेतकरी वर्ग व कोरडवाहू धान उत्पादकांची पूरती वाट लागली आहे. गावनिहाय सादर होणाऱ्या पिक आणेवारीकडे नजर अंदाज न करता विशेष लक्ष देऊन स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावातील तलाठी व महसूल अधिकाऱ्यांकडे विशेष मागणी लावून धरुन काँग्रेस पक्षांची शेतकऱ्यांविषयी असलेली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहनही चन्नावार यांनी तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या तालुक्याचा आवाज स्थानिक आमदार तथा विधानसभा उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पोहचविण्याची तयारी करावी, असेही तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. (वार्ताहर)
सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Published: November 23, 2015 1:03 AM