खडसंगी : सुदृढ व चांगले मूल जन्माला यावे, ही प्रत्येक मातापित्याची मनोमन इच्छा असते. मात्र ते मानवाच्या हाती नाही. निर्मिक जे करेल त्यावरच मानवाला समाधान मानावे लागते. चिमूर तालुक्याच्या टोकावर वसलेल्या साठगाव येथील सबाबाई व किसन मालोदे यांच्या संसारवेलीवर चार अपत्ये जन्माला आली. चारही अपत्ये सुदृढ व्हावी, अशी इच्छा असताना मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तिसऱ्या क्रमाकांची शेवंता ही मतिमंद व अपंग जन्माला आली. आज ती २० वर्षांची आहे. मात्र तिचे वृद्ध वडील किसना मालोदे तेवढ्याच प्रेमाने तिचे पालनपोषण करीत आहेत. त्यामुळे शेवंताला नियतीने दृष्टकृपेने नाकारले असले, तरी सबाबाई व किसनाच्या वात्सल्याने स्वीकारले आहे.चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या साठगाव येथील किसान रामचंद्र मालोदे व सबाबाई यांचा ४० वर्षांपूर्वी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. किसनकडे एक हेक्टर शेती असून या शेतीसह रोजमजुरीवर कुटुंबाचे पालनपोषण सुरू आहे. सबाबाई व किसनाच्या संसारवेलीवर तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये जन्माला आली. दोन मुलींचा विवाह झाला असून अपंग शेवंता व मुलासह रोजमजुरीवर आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत आहे. परिस्थितीमुळे मुलाने शिक्षण सोडून वडिलाच्या कामात हातभार लावणे सुरू केले आहे. मात्र आता उतारवयात अपंग व मतिमंद शेवंताची चिंता त्यांना सतावत आहे. आपण किती वर्ष जगू आणि आपल्यानंतर शेवंताचे काय होईल, या विवंचनेत ते जीवन जगत आहेत. अपंग शेवंताला शासकीय मदत मिळू शकते, अशी माहिती किसनला मिळाल्याने थोडासा धीर आला. सरकारने निराधार, अपंग, विधवा यांना संजय गांधी निराधार योजनेतून महिन्याला काही प्रमाणात आधार दिला जातो. आपल्यानंतरही शेवंताला काही दिवस मदत व्हावी म्हणून वृद्ध किसनाने नऊ महिन्याअगोदर शेवंताच्या नावाने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्रकरण तलाठ्यामार्फत पाठविले. मात्र प्रशासनाच्या लालफितीत व अधिकाऱ्यांच्या दिरंगाईने अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाही. वृद्ध किसन तहसील कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत.(वार्ताहर)
नियतीने नाकारले : मात्र वात्सल्याने स्वीकारले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2015 12:50 AM