लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या महिनाभरात ढोरपा पाहार्णी परिसरात धुमाकूळ घालून दोघांचा बळी व तिसऱ्या महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या त्या वाघाची पडताळणी वनविभागाने सुरू केली आहे. मात्र पडताळणीच्या दुसऱ्या दिवशीही त्या वाघाने हुलकावणी दिली.वनविभागाने बुधवारपासून ढोरपा पाहार्णी शिवारात हल्लेखोर वाघ नेमका तोच आहे का, याची खातरजमा करण्यासाठी ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या वाघाची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. बुधवारपासून वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघाचा मागोवा घेत आहेत. शिवाय त्या परिसरात कर्मचाऱ्यांची गस्तही सुरू आहे. मात्र हल्लेखोर वाघ दिसून आला नाही. वनविभागाने गुरुवारी ही शोधमोहीम राबविली. मात्र गुरुवारीही वाघाने हुलकावणी दिली. ढोरपा पाहार्णी परिसर हा जंगलव्याप्त आहे. म्हसली, विलम, तेलीमेंढा, कोथुळणा, बालापूर, तोरगाव या गावापर्यंत या जंगलाची व्याप्ती आहे. त्यामुळे या वाघाने आपला मुक्काम कोणत्या गावाकडे हलविला असावा याबाबत विविध तर्क काढण्यात येत आहेत.
गावकरी ॲक्शन मोडवरवनविभागाने येत्या चार दिवसांत या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त केला नाही तर ढोरपा पाहार्णी आणि परिसरातील नागरिक वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून आपला राग व्यक्त करणार आहेत, अशी माहिती मौशीचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ती जखमी महिला कोमातचचार दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सविता सोमेश्वर भुरले या महिलेवर ब्रह्मपुरी येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र सविता कोमातच असल्याची माहिती सविताच्या नातेवाइकांनी दिली.