परिमल डोहणे चंद्रपूर : कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका येथील लेहमन लायब्ररीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १३ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून लंडन येथील चेव्हनिंग स्कॉलर, पोलिलॉ नेटवर्क फाउंडेशनचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रहिवासी ॲड. दीपक चटप यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून कोलंबियासारख्या विद्यापीठात प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी जाणारा दीपक हा पहिलाच व्यक्ती असल्याचे बोलल्या जात आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. विष्णू माया परियार, मॅसाचुसेट्स विद्यापीठ, बोस्टन येथील पीएच.डी. स्कॉलर दादासाहेब तांडले, लंडन येथील चेव्हनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप हे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, न्याय आणि शिक्षणाच्या विचारांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून उजाळा देण्यात येणार आहे.
कोण आहे दीपक चटप?
ॲड. दीपक चटप, चंद्रपूरच्या दुर्गम भागातून शिक्षण घेत लंडन विद्यापीठातून उच्चशिक्षण पूर्ण केले. त्यांनी विदर्भातील दुर्गम भागात शिक्षण यात्रा राबवली आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक न्यायासाठी अनेक जनहित याचिका दाखल केल्या. ज्यामध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) प्रकरणातील महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय समाविष्ट आहे.