चंद्रपूर जिल्हा महसूल प्रशासनात ‘अ’ वर्गात जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गासह ४३ पदांचा आकृतीबंध मंजूर आहे. यातील ३६ पदे भरण्यात आली मात्र, भू-संपादन, रोजगार हमी योजना, अतिक्रमण, निवडणूक, उपविभागीय अधिकारी या घटकातील उपजिल्हाधिकारी व दोन तहसीलदार संवर्गातील पदे रिक्त आहेत. जिल्हा महसूल विभागाच्या ‘ब’ वर्गात लेखाधिकारी, नायब तहसीलदार, निरीक्षण अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक संवर्गासह ८७ पदांना मंजुरी आहे. मात्र यातील ६९ पदे भरण्यात आली तर ८ पदे रिक्त आहेत. १२ पदांचा अनुशेष केवळ नायब तहसीलदारांचा आहे. कोरोनामुळे राज्य शासनाने भरती प्रक्रियेवर बंधने घातली. एकाच अधिकाऱ्याला विविध विभागांचा कारभार पाहावा लागत आहे. परिणामी, विविध कामे करण्यासाठी ताटकळत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
‘क’ श्रेणीतील पदांची स्थिती
‘क’ वर्गात सर्वाधिक ८६९ पदांना मंजुरी आहे. यातील ७६६ पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये वरिष्ठ लिपिकांचे ०६, लिपिक टंकलेखक ६८, तलाठी २२ पदांचा समावेश आहे. शिपाई ‘ड’ वर्गातील २०६ मंजूर पदापैकी १४७ पदे भरली आहेत. शिपायांचे ५९ पदे महसूल प्रशासनात रिक्त आहेत. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला तरच नागरिकांची खोळंबलेली कामे मार्गी लागू शकतात.