चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे यांची नागपूर येथे विनंती बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार भद्रावती येथील गटशिक्षणाधिकारी रामदास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे पदभार दिल्यानंतर शिक्षक संघटनांसह शिक्षकांमध्ये नाराजी असून वादग्रस्त गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पदभार देवून जिल्हा परिषद प्रशासन काय, साध्य करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.गुढे यांच्यापूर्वी प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून रामदास पाटील यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. तेव्हा अनेक विषय वादग्रस्त राहिले. वेतनास विलंब, तसेच काही कामे प्रलंबित ठेवल्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. त्यांच्या विरोधात अनेक शिक्षक संघटनांनी त्यावेळी आंदोलनाचा मार्गही अवलंबला होता. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा पदभार देवून जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांचा संताप ओढवून घेतला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार निरंतर शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी किंवा स्थानिक गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे देणे अपेक्षित असताना भद्रावती येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पदभार देण्याचे कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, माहितीच्या अधिकारात माहिती न दिल्यामुळे त्यांना २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागल्याची माहिती समोर आली आहे.(नगर प्रतिनिधी)
वादग्रस्त गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार
By admin | Published: June 16, 2014 11:25 PM