सदर वृक्षतोड करताना पर्यावरण तथा वन विभागामार्फत कसलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, तसेच माथरा ग्रामसभेमार्फत निर्णय घेण्यात आलेला नव्हता.
सदर वृक्षांची तोड का करण्यात आली, याबाबत ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडे या प्रश्नांचे उत्तर नाही. याचाच अर्थ वृक्षाची तोड ही फक्त गावातील काही व्यक्तींचे हितसंबंध जोपासण्यासाठी तर केलेली नाही ना, अशी शंका येते. सर्वोच्च न्यायालय तसेच सरकारच्या विविध कायद्यान्वये कोणत्याही परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वृक्षाची तोड करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छतेच्या नावाखाली आपल्या अधिकाराचा गैरवापर करून वृक्षांची तोड केलेली आहे. याची चौकशी करून ग्रामपंचायतीमधील संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच लहु चहारे यांच्या नेतृत्वात माथरा येथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे केली आहे.