गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने अडचण जाते.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जुन्या वाहनांची तपासणी करा
ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
बार्टीचे मोफत प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने मागील वर्षी बार्टीतर्फे मोफत स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात आले होते. कोरोनाने अद्यापही शिकवणी वर्ग घेण्यास मुभा नसल्याने यंदाही बार्टीतर्फे मोफत प्रशिक्षण राबविण्याची मागणी होत आहे.
तारसा येथील नाल्यांचा उपसा करा
वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २ सह इतर वाॅर्डांमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या उपसा न केल्याने तुडुंब भरलेल्या आहेत.
संगमेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या
कोरपना : चंद्रपूर- यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील, पैनगंगा व विदर्भ नदीच्या संगमस्थळावर असलेल्या संगमेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. या संगमस्थळावरील मंदिर प्राचीन असून, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास
कोरपना : तालुक्यातील वनसडी ते कवठाळा फाटा मार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम कासवगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील चिखलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक करतात. त्यामुळे रहदारीस अडचण जाते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे मार्गाची मागणी
मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
उद्योगांची निर्मिती करावी
सिंदेवाही : तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघुउद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ
राजुरा : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. असे असतानाही काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी आहे.