नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
वाहनावर मोबाईलचा वापर धोकादायक
सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेकजण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठी ही धोकादायक ठरणारा आहे.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शकांचा अभाव
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमा दरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतुकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गापैकी एक आहे. त्यामुळे दिवसरात्र या मार्गावरून अवागमन सुरू असते, परंतु दिशादर्शक, अंतर, वळण, गावाचे नाव असे मार्गदर्शक फलक लावण्यात आले नाही.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
घुग्घुस : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
पांदण रस्त्यांची समस्या सोडवा
घोडपेठ : परिसरातील पांदण रस्त्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागतो. घोडपेठ गावाच्या नकाशावर शेत, रस्ते, पांदण रस्त्यांची नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात रस्तेच नाहीत.
पडोली चौकातील अतिक्रमण हटवा
पडोली : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. हा चौक नेहमी गजबजलेला असतो. अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवण्याची मागणी
सिंदेवाही : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बँकांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व बँक कर्मचारी मास्क, सॅनिटायझर व हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करीत आहेत. बँक शाखेत एकावेळी कमीत कमी ग्राहकांना आत सोडले जात आहे. बँक व कंत्राटदाराने एटीएमचे संपूर्ण सॅनिटायझेशन करण्याचे निर्देश असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.
ग्रामीण स्मशानभूमीची दुरवस्था
चंद्रपूर : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना मागील काही वर्षांपासून सुरु करण्यात आली होती. जिल्ह्यातील सावली, मूल, गोंडपिपरी, पोंभूर्णा आदी तालुक्यातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.