जगाचा अन्नदाता म्हणून बळीराजा अनेक आस्मानी-सुलतानी संकटे झेलत राबराब राबून अन्न पिकवितो. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना करत असताना कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी शेतीत कष्ट करूनही पदरात काही पडत नसल्याने हवालदिल झाला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
कोरोना, लॉकडाऊन, पिकाची होत असलेली नासाडी, या पार्श्वभूमीवर अनंत अडचणी शेतकऱ्यांसमोर आहे. डिझेल-पेट्रोलचे वाढलेले भाव, वीजबिलाची वसुली, वाहतुकीचा खर्च, मजुरांची कमतरता, वाढ झालेला उत्पादन खर्च यामुळे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांची मुले शेतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या दरात ५५ टक्के वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. शासनाने तातडीने भाववाढ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अली यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.