घुग्घुस : येथील वेकोलिच्या राजीव रतन केंद्रीय दवाखान्यातील कोविड लसीकरण केंद्रावरील लसीकरणाची संख्या लक्षात घेता, संगणक संच, डाटा ऑपरेटर तसेच प्रतीक्षालयात बसण्याची व्यवस्था अधिक सक्षम बनविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिनांक १६ मार्चपासून वेकोलिच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात कोविडचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील लसीकरणाला स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी प्रतिसाद दिला. लसीकरण करणाऱ्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. बसण्याची अपुरी जागा, पंख्यांची अपुरी संख्या असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या केंद्रावर दररोज शंभरपेक्षा अधिक लसीकरण होत आहे.
लसीकरणासाठी सध्या एक संगणक व डाटा ऑपरेटर असल्याने आधारकार्ड तपासून पाहण्यासाठी वेळ जातो. त्यासाठी आणखी एक संगणक व डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.