रस्त्यांवर बांधकाम साहित्य
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
व्यावसायिकांचे अर्थसाहाय्य अडले
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद मालगुजारी तलावात मत्स्यपालन करतात. मात्र, योजनेचे अर्थसाहाय्य योग्य प्रमाणात मिळत नाही. संबंधित विभागाने ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्यासारखीच स्थिती आहे. युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणा
चंद्रपूर : येथील लालपेठ, पडोली, बंगाली कॅम्प परिसरातून बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र धोकादायक व वर्दळीच्या वळणांवरही चालक वाहनाचा वेग कमी करीत नाहीत़ त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़
डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : नागभीड, सिंदेवाही व चिमूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील काही गावांत डास प्रतिबंधनात्मक औषधाची फवारणी करण्यात आली नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
महामार्गावरील पुलावर जीवघेणे खड्डे
कोरपना : आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महेंदी येथील नाल्याच्या पुलावर खड्डे पडल्याने वाहतूकदारांना तारेवरची कसरत करीत वाहन चालावावे लागते. यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत. हे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
कोरपना : नांदा गावालगत उद्योग असल्याने येथे मागील काही वर्षांमध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढली आहे. त्या तुलनेत बसस्थानकाच्या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घुग्घुस परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी
घुग्घूस : परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. औद्योगिक शहर म्हणून घुग्घुसची ओळख आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वाहनधारक येतात. मात्र खड्ड्यांमुळे ते हैराण आहेत. बांधकाम विभागाने ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
निधीअभावी घरकुलाची कामे रखडली
चंद्रपूर : निधी व रेतीच्या अभावामुळे पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, रमाई व शबरी योजनेच्या घरकुलांची देयके रखडल्याने लाभार्थी चिंताग्रस्त आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत घरे रेतीअभावी रखडली आहेत. त्यामुळे रेती तसेच निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.