आम आदमी पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंदेवाही : जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्या जवळील व इतर शेतकऱ्यांची शेती खरडून जाणे, बांध वाहून जाणे, गाळ साचणे आदी प्रकार घडल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच भाताची पऱ्हे व इतर पिके पाण्यात बुडून राहणे, वाहून जाणे व गाळ साचल्यामुळे बहुतांशी पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. या सर्व नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक भरपाई देण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. आधीच उत्पादन खर्चावर आधारीत भाव न देणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नापिकीला कंटाळून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला त्यांना मिळावा म्हणून शेतकरी व गावनिहाय सर्व्हेक्षण व पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, असे निवेदन आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मनोहर पवार, जैयदेव श्रीरामे, खटूजी गुरनुले, गोमाजी मस्के, वंदना गजभिये, बोरकर, मेश्राम, विनायक गजभिये, रमेश भरडकर, आनंदराव मस्के, उद्धव लोखंडे, दिलीप बोरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी
By admin | Published: July 27, 2016 1:21 AM