ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : बोरगाव रोडवरील रामदेवबाबा साल्वंट प्लांटमधून मोठ्या प्रमाणात जीव घेणारा विषारी वायू पसरत आहे. या प्लांटमधून निघणाऱ्या धुरामधून तेलकट पदार्थ, कण व विषारी पदार्थ ब्रह्मपुरी शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये उत्सर्जित होत असल्याने परिसरातील अनेक घरांमध्ये काळा तेलकट थर जमा होत आहे. घरामधील वाहनावर हा थर दिसून येतो.
नागरिकांना या विषारी वायूमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. भविष्यात हा प्लांट अनेक नागरिकांना आजाराचे निमंत्रण देणार आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी-बोरगाव रोडवर असलेल्या रामदेवबाबा साल्वंट प्लांट तत्काळ बंद करण्याची मागणी ब्रम्हपुरी नगरपरिषद नियोजन सभापती महेश भर्रे यांनी केली आहे.
सदर प्लांटच्या आजूबाजूला उदापूर, नवेगाव, बोरगाव, झिलबोडी, परसोडी, मालडोंगरी, चिंचोली आदी गावे असून ब्रम्हपुरी नगरपरिषद क्षेत्रात असलेले ज्ञानेशनगर, पेठवार्ड, टिळकनगर, धुमनखेडा आदी परिसर येतात. या प्लांटच्या विषारी वायूमुळे वरील परिसरातील लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झळ बसत आहे. या प्लांटच्या वायू प्रदूषणाची मात्रा प्रदूषण विभागाने त्वरित तपासणी करावी, अशी मागणी सभापती महेश भर्रे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे रामदेवबाबा प्लांटमध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाची कुठलीच परवानगी न घेता अवैध बांधकाम करण्यात आल्याचा आरोप भर्रे यांनी केला असून, या अवैध बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, विभागीय आयुक्त, नागपूर, अप्पर सचिव पर्यावरण व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना निवेदन दिले आहे. पुढील कारवाई न केल्यास ब्रह्मपुरी नगरपरिषदच्या समोर जनआंदोलन व आमोरण उपोषण केला जाईल, असा इशाराही सभापती महेश भर्रे यांनी दिला आहे.
भुतीनाल्यामध्ये रसायनयुक्त पाणी
रामदेवबाबा प्लांट हा भुतीनाला जवळ असल्याने येथील प्रदूषित तथा रासायनिक पाणी हे या भुतीनाल्यामध्ये प्रवाहित करण्यात येते. यामुळे जल प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप भर्रे यांनी केला आहे. भुतीनाल्याचे पाणी हे जनावरे तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र तेथील पाणी प्रदूषित होत असल्याने जनावरांना पिण्यायोग्य नाही. तसेच भुतीनाल्याधील पाणीपुरवठा हा ग्रामीण भागात होत असल्याने भविष्यात येथील रासायनिक पाण्याने अनेक दुर्धर आजार होण्याची शक्यता महेश भर्रे यांनी वर्तविली आहे.
रामदेवबाबा साल्वन्ट कंपनी गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. कंपनीने देशात दुसरा क्रमांक प्राप्त करून ब्रम्हपुरीचे नावलौकिक केले आहे. प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. दूषित पाणी रिसायकलिंग करून कंपनीतच वापरले जात आहे. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही.
-नीलेश मोहता, संचालक, रामदेवबाबा साल्वंट प्रा. ली. ब्रम्हपुरी(बोरगाव).