लोकमत न्यूज नेटवर्क पोंभूर्णा : येथील ग्रामीण रुग्णालय आता शवविच्छेदनासाठी आलेल्या मृतदेहावर कर आकारून टाळूवरील लोणी खाणारी यंत्रणा तयार झाली आहे. याचे जिवंत उदाहरण पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात ५ ऑक्टोबरला पाहायला मिळाले.
चेक ठाणेवासना येथील खासगी इलेक्ट्रिशिअन हा उमरी पोतदार येथील पोस्टमास्तरच्या घराची लाइट फिटींगचे काम करताना झरी मारणारी ग्रैंडर मशीन घेऊन खाली पडला व यात त्याचा मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या सहायकांनी मृतकाच्या कुटुंबीयांना चक्क दीड हजार रुपयांची मागणी केली. यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठीही कर आकारला जात असल्याची ओरड असून, शवविच्छेदनासाठी पैसे घेणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही आता नागरिकांकडून केली जात आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील ईश्वर जगन्नाथ चिताडे (४०) हा खासगी इलेक्ट्रिशिअनचे काम करतो. ५ ऑक्टोबर २०२४ ला ईश्वर चिताडे हा उमरी पोद्दार येथील पोस्टमास्तर सीताराम पुरमशेट्टीवार यांच्या घरी इलेक्ट्रिक फिटींगचे काम करताना ग्रँडर मशीन घेऊन तो अचानक खाली पडला व यात त्याचा मृत्यू झाला. त्याला सकाळी ११:३० च्या सुमारास शवविच्छेदन करण्याकरिता पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्यांनी यासाठी दीड हजार रुपयांची मागणी केली. परंतु, त्या कुटुंबीयांकडे त्यांना देण्याकरिता तेवढे पैसे नव्हते. जमावाजमव करून दीड हजार रुपये त्या कर्मचाऱ्याला दिल्यानंतरच दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह घेऊन कुटुंबीयांना गावाकडे जाता आले.
"शवविच्छेदन करणाऱ्यांनी दीड हजार रुपयांची कुटुंबीयांकडून मागणी केली. त्यावेळी मी त्या कुटुंबीयांसोबतच उपस्थित होतो. मोफत सेवा देणारी आरोग्य यंत्रणा ही आता शवविच्छेदनावरही कर लादत आहे. त्यामुळे शवविच्छेदनासाठी पैसे मागणाऱ्यांवर कार्यवाही करावी व यानंतर शवविच्छेदनासाठी पैसे घेऊ नये, यासाठी वरिष्ठांनी निर्बंध घालावे."- वैभव पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ते, चेक ठाणेवासना.
"पैशांसाठी शवविच्छेदन करताना अडवणूक केली व पैशांची मागणी केली, असा जो आरोप करण्यात आला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. शवविच्छेदनासाठी आमच्या सहायकांनी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत." - डॉ. अभिषेक हिंगे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा.