कोरपना-उमरेड बसची मागणी
चंद्रपूर : कोरपना येथून वणी-चिमूरमार्गे उमरेड बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. या बससेवेमुळे कोरपना येथील नागरिकांसह वणी, वरोरा, चिमूर परिसरातील प्रवाशांना सोयोचे होईल. या संदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
गावफलक लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र, यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असते. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ
राजुरा : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्रे मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, ते रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत असल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला हे कुत्रे कळपाने असतात. अनेक वेळा रात्री दुचाकींच्या मागे कुत्रे धावतात. ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.