चंद्रपूर : गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूरच्या वतीने पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांना गोंडीयनाचे आराध्य दैवत महाराजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन प्रथा बंद करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. गोंडीयन गणातील मूळ निवासी गोंड राजा रावनसिंह मडावी यांच्या प्रतिमेचा काही समुदायाकडून असंवैधानिकपणे रुढी परंपरा समजून दरवर्षी रावण राजाच्या प्रतिमाचे दहन करुन महोत्सव साजरा केला जातो. अशा महोत्सवातून चुकीचा इतिहास जगासमोर ठेवून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. गोंडीयन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. त्यामुळे हा महोत्सव तात्काळ बंद करावा अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे सचिव सुधाकर कन्नाके, प्रा. धिरज शेडमाके, रमेश कुमरे, ज्योतीराव गावंडे, उमाजी कोडापे, मुक्तेश्वर कुमरे, सारंग कुमरे, दिनेश कुमरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
गोंड राजा रावन दहन प्रथा बंद करण्याची मागणी
By admin | Published: October 07, 2016 1:10 AM