बल्लारपूर : मागील अनेक वर्षांपासून शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातून नियमित धान्य मिळत नाही. कोरोना संकटापासून अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. यामुळे त्यांना धान्य वितरित करण्यात यावे, यासाठी आम आदमी पक्षाच्या स्थानिक शाखेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.
याशिवाय १५ वर्षांपासून दरिद्र्यरेषेखाली येणाऱ्यांचा सर्व्हेही झाला नाही. यामुळे याचा फायदा अनेक शिधापत्रिकाधारक घेत आहेत. म्हणून पुन्हा (बीपीएल) दारिद्र्यरेषेखालील येणाऱ्यांचा सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी आप पक्षाने केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नव्हत्या, त्यांना २०१९ पासून केशरी शिधापत्रिका बनवून देण्यात येत आहे, परंतु या लोकांना धान्य देण्यात येत नाही. अशांना धान्य देण्यात यावे. निवेदन देताना आप पक्षाचे रवि पुप्पलवार, राकेश वडस्कर, नीलेश जाधव, अफजल अली, आसिफ शेख, सुधाकर गेडाम, शुभम गेडाम, महिला अध्यक्ष अलका वेले व इतर सदस्यांची उपस्थिती होती.