शासनाचे धोरण कारणीभूत : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे निवेदनराजुरा: मूल तालुक्यातील सुशिदाबगाव येथील आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक गणेश मोहितकर यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. अनियमित वेतनामुळे व विद्यार्थी संख्येच्या जाचक अटीमुळे सदर शिक्षकांनी आपले आयुष्य संपविले. याला जबाबदार शासनाचे धोरण आहे. त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांच्या कुटुंबियास मदत देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुलकर्णी यांच्याकडे एका निवेदनातून गुरूवारी केली. विदर्भ माध्यमीक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यात एस. जी, टोंगे, सी.जी. मोरे, पी. बी. शिवरकर, मालेकर, गेडाम, बावने, चौधरी, रेगुंडवार, राठोड, डोईजड, ढोले यांची उपस्थिती होती. अनियमित वेतनामुळे आश्रमशाळेतील शिक्षक हवालदिल झाले आहेत. त्यातून हे शिक्षक कर्जबाजारी होत आहेत. बँकेचे कर्ज, आप्तेष्ठांचे देणे, यांची परत फेड करुन शकले नाही. शिवाय काम नाही तर दाम नाही, या शासन निर्णयामुळे नोकरीत असुरक्षितता निर्माण झाली. त्यामुळेच गणेश माहितकर यांनी आत्महत्या केली, असा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे. विद्यार्थी संख्येच्या जाचक अटीमुळे शाळेतील पटसंख्या टिकविण्यासठाी ४७ डिग्री तापमानातही शिक्षक दारोदार भटकत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या असुरक्षित झाल्या आहेत. आपली पदे टिकविण्यासाठी शिक्षकांवर मानसिक ताण निर्माण झाला आहे. असे घातक निर्णय शासनाने तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. देशाचे पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतो. मात्र शासनाच्या अशा निर्णयामुळे शिक्षण क्षेत्र हादरले आहे. शिक्षकावर आत्महत्या करण्याची पाळी आली, हे अत्यंत दुर्दैवी असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे, असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिक्षण क्षेत्राबाबत शासनाची उदासिनता हे भविष्यातील धोक्याची घंटा आहे. शासनाच्या घातक निर्णयामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. शासनाने १ एप्रिलचा काळा जीआर रद्द करावा किंवा सामाजिक हित लक्षात घेऊन सुधारणा करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त पी. जी. कुळकर्णी यांनी मृत शिक्षकांच्या पत्नीस तात्पुरते चिमूर येथील मुलींच्या वसतिगृहात मानधनावर पर्यवेक्षक पदावर नियुक्त करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
मृत शिक्षकाच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी
By admin | Published: June 03, 2016 12:55 AM