चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या आहे. काही रुग्ण या महामारीच्या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. राजुरासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी १८ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात असली तरी ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र असेल त्या ठिकाणी आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. गावपातळीवर लसीकरण केंद्र सुरू झाले तर होणारी गर्दी टाळता येईल. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य करावे, असेही कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी सांगितले.
बॉक्स
लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी टाळावी
कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असला तरी कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधित लसीकरण काही ठिकाणी सुरू केले आहे. परंतु, ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र आहे, त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोरोना प्रतिबंधित लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.