राजुरा : शहरात विविध शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालये आहेत. या शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी येतात. मात्र, विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने तासिकेपासून वंचित राहावे लागत आहे. काहीवेळा बस न मिळाल्याने घरी परत यावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत परिसरातील रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे अशा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सरकारी निवासस्थाने झाली दुर्लक्षित
सिंदेवाही : शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधली आहेत. मात्र, त्यांचा उपयोग अपवादानेच केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणची निवासस्थाने दुर्लक्षित आहेत. प्रामुख्याने आरोग्य सेवेंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची सोय करून दिली आहे. मात्र, त्यांचा वापरच केला जात नसल्याने ही निवासस्थाने ओस पडली आहेत.
बसमध्ये प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करा
ब्रह्मपुरी : प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी, असे परिवहन विभागाचे सर्व आगारांना निर्देश आहेत. मात्र, ग्रामीण भागात धावणाऱ्या बसमध्ये प्रथमोपचार पेटीच नसते. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्देशाची आगारांकडून अवहेलना होत आहे. एखाद्यावेळी अपघात झाल्यास जखमीवर उपचार करण्यात यामुळे अडचण येऊ शकते. याकडे आगार प्रशासनाने लक्ष देऊन आपत्कालिन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नोकरभरती नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न
गोंडपिपरी : कोरोना संकटामुळे अजूनही नोकरभरती पाहिजे तशी होत नसल्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. अनेकांनी पैसे खर्च करुन स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू केले. मात्र, शासनाकडून नोकरभरतीच्या जागा निघणे बंद झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे.
जिवती तालुक्यातील समस्या सोडवा
जिवती : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत. जिवती तालुक्याची स्थापना होऊन आता अनेक वर्षे झाली तरीही वीज, रस्ते, पाणी अशा मुलभूत सुविधाही येथे पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. या सुविधांअभावी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वनसडी ते पिपर्डा रस्त्यावर खड्डे
कोरपना : कोरपना तालुक्यातील वनसडी ते पकडीगुड्डम धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालवताना कसरत करावी लागते.
महावितरणचे जनित्र बनले धोकादायक
कोरपना : महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनेक गावांमधील डीपी उघड्या आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून, महावितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे.
गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा
जिवती : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वाहतुकीसाठी त्रासदायक ठरलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावरील अंधार दूर करा
कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गांवर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस स्थानक, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, तालुका क्रीडा संकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.
भद्रावती तालुक्यात रानडुकरांचा हैदोस
भद्रावती : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील काही गावांच्या शिवारात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेल्या पिकांचे रानडुकरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
राजुरा : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. गत आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसातच ही मोहीम थंडावली. त्यामुळे अवैध वाहतुकीला पुन्हा जोर आला असून, याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.