जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व कळू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्राधान्य गटाची संख्या लक्षात घेऊन एक लाख १७ हजार डोसची मागणी केली. मात्र, सोमवारी जिल्ह्याला केवळ २९ हजार ७०० डोस पाठविण्यात आले. नागपूरसाठी एक लाख ३२ हजार, भंडारा जिल्हा २३ हजार ३००, गोंदिया १५ हजार ८०० व वर्धा जिल्ह्यासाठी १५ हजार डोस मंजूर करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृतकांची संख्याही सातत्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले. अशा संकटाच्या काळात लसीकरण हा एक पर्याय आहे; परंतु मागणीनुसार जिल्ह्याला डोस मिळत नसल्याने पुन्हा केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.
चंद्रपूर शहरासाठी फक्त ३ हजार
चंद्रपूर शहरात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील लोकसंख्येचा विचार केल्यास प्रत्येक टप्प्यात सुमारे २० ते २५ हजार डोसची गरज लागू शकते. मात्र, फक्त ३ हजार डोस चंद्रपूर शहराच्या वाट्याला आले. त्यामुळे पंतप्रधान कशासाठी लस उत्सव साजरा करतात, असा प्रश्न विचारला जात आहे.