रोजगार हमीची कामे सुरु करा
चंद्रपूर: काही गावांतील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संकटामुळे गावातील काही नागरिकांकडे कामच नसल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालनपोषण करताना अडचण येत आहे.
कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे
चंद्रपूर: कोरोनामुळे सर्वत्र दहशत आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिक आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर सरपंच, सदस्यांनाही विमा कवच लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात काही ग्रामपंचायतींनी ठरावही घेतला आहे.
सोशल डिस्टन्सचा बाजारात फज्जा
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहत असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांची लगबग
चंद्रपूर : एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण अडकला आहे. यामध्ये शेतकरीही सुटला नाही. दरम्यान आता पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलल्यामुळे या कामात आता वेग आला असून शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
कोरोनामुळे कर्ज माफ करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आले. दरम्यान, दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि विविध योजना अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेतून व्यवसायासाठी घेतलेले कर्ज भरणे आता कठीण होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे कर्ज शासनाने माफ करावे, अशी मागणी आता केली जात आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक नागरिकांनी व्यवसाय थाटण्याकरिता शहरी व ग्रामीण सुवर्ण जयंती रोजगार योजनेसह इतर योजनेतून राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेतले. मात्र यावर्षीही लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे कर्जाची परतफेड करणे सद्यस्थितीत कठीण जात आहे.
५ वाजेपर्यंत दुकानांची वेळ ठरवा
चंद्रपूर: सध्या लॉकडाऊन सुरु असून सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक साहित्याची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या वेळेमध्ये गर्दी होत असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आधारसाठी नागरिकांची चिंता
चंद्रपूर : सामान्य नागरिकांची ओळख असलेल्या आधार कार्ड काढण्यासाठी काही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी लसीकरणासाठी आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती. मात्र लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्यामुळे नागरिकांचा नाईलाज आहे.
अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बनवा
चंद्रपूर: शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. वर्दळीच्या अनेक मार्गावर गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बनवावे, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात वाहनांची वर्दळ कमी आहे. त्यामुळे यावेळी गतिरोधक तयार केल्यास प्रशासनाला सोईचे होणार आहे.
शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा
चंद्रपूर : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
खुल्या जागांमुळे दुर्गंधीत वाढ
चंद्रपूर :महापालिका प्रशासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून वार्डा-वार्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे. ओपन स्पेसची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.