जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर पावडे व अन्य.
चंद्रपूर : शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव प्रदूषणमुक्त व खोलीकरणासाठी विशेष निधी देण्यात यावा, अशी मागणी महापौर राखी कंचर्लावार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली.
मनपातर्फे रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून रस्ता, स्ट्रीट लाईट, तलावाला स्टीलचे ग्रील व सिंगापूर पॅटर्नचा स्टॅच्यू उभारून सौंदर्यीकरण केले. तलावातील इकॉर्निया काढण्याचे काम मनपातर्फे करण्यात येते. रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. रामाळा तलावासंदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समस्यांसाठी महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रामाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठी विविध कामे करण्याची आवश्यकता आहे. या कामाचे अंदाजपत्रकही मनपातर्फे सादर करण्यात आले आहे. रामाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठी तलावातील गाळ काढून स्वच्छ करणे, तलावाच्या पश्चिम बाजूला रिटेनिंग वॉलचे बांधकाम करणे, मलनिस्सारण प्रक्रिया एसटीपीचे बांधकाम करणे तसेच मच्छीनाल्याचा प्रवाह झरपट नदी येथे वळविण्याकरिता पक्के नाला बांधकाम, तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण आदी कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून, गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. मनपाचे आर्थिक स्रोत असलेली करवसुली अत्यंत कमी असल्याने मनपाकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळे रामाळा तलाव विकास कामे करण्यास ५० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी मनपाचे उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी, भाजपा शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे सभागृह नेते संदीप आवारी, नगरसेवक विशाल निंबाळकर, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, दत्तप्रसन्न महादाणी आदी उपस्थित होते.