हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे
चंद्रपूर : जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. संबंधित विभागाकडे लक्ष देऊन हातपंप दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चिखलाच्या रस्त्यातून शेतकऱ्यांचा प्रवास
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले नसल्याने शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट शोधावी लागत आहे. दुसरीकडे शेतीसाठी लागणारे साहित्य, नेतानाही मोठी कसरत करावी लागत आहे.
आधार कार्ड काढण्यासाठी गर्दी
चंद्रपूर : सर्वसामान्य नागरिक शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने नागरिक सध्या आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड केंद्रामध्ये गर्दी करीत आहेत. चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या केंद्रावरही गर्दी बघायला मिळत आहे.
झरपट नदीपात्रात मुलांची गर्दी
चंद्रपूर : येथील झरपट नदीच्या पात्रामध्ये मोठ्या संख्येने परिसरातील छोटे मुले पोहण्यासाठी जात आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या नदीपात्रात पाणीसाठा वाढला आहे.
शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव आहे. कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन शासकीय कार्यालयातील शौचालय सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अल्प वेतनात काम सुरू
चंद्रपूर : कचरा संकलित करणाऱ्यांना अत्यल्प वेतन दिल्या जात असल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालन पोषण करताना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलकांचे वेतन वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांना मजुरांची चिंता
चंद्रपूर : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच आता पावसाचे दिवस असल्यामुळे शेतीकामाची लगबग आहे. दरम्यान, मजुरांना मजुरी देताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.