कोरपना : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुकास्तरावर एकदिवसीय शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरपना येथे असे शिबिर घेण्यात येत नाही. त्यामुळे याठिकाणी परिवहन कार्यालयाने शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
शिकाऊ अनुपती, पक्के अनुपती तसेच वाहनाची नोंदणी आदी कामांकरिता महिन्यातील एक दिवस प्रत्येक तालुक्यात शिबिर घेतले जाते. कोरपना हे तालुक्याचे ठिकाण आहे. परंतु, येथे असे शिबिर केव्हाही घेण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना गडचांदूरला शिबिर असल्यास तेथे जावे लागते. यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यव होते तसेच आर्थिक भुर्दंडही बसतो. त्यामुळे कोरपना येथे वाहन परवाना शिबिराचे आयोजन केल्यास नागरिकांना सोयीचे होईल. परिसरात अनेक वाहनचालकांकडे वाहन परवाना नाही. त्यांनाही परवाना काढता येईल. या शिबिराचा फायदा परिसरातील नागरिकांना होऊन जनजागृतीही निर्माण होईल. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीकडे लक्ष देऊन कोरपना येथे शिबिर घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.