लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या भागात रोजगार निर्मिती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हमखास नोकरीची संधी असलेल्या या प्रशिक्षणातून बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.विदर्भातून मोठ्या प्रमाणात सुरत व मुंबई या परिसरातील डायमंड कटींग अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तरुण काम करतात. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षणाची गरज असते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी आहे. किमान कौशल्य आवश्यकता असणाऱ्या या व्यवसायामध्ये हमखास २० ते ४० हजार रुपये प्रति महिना असा रोजगार मिळतो. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०१६ रोजी बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणातून दरवर्षी एक हजार तरुणांना सुरत, मुंबई आदी शहरांमध्ये नोकरी देण्याची हमी संबंधित कंपनीने घेतली आहे. आतापर्यंत युवकांच्या दोन तुकड्या येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. यातील अनेकांना विविध शहरात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदात आहे.प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. अनेकांना येथून प्रशिक्षित झाल्यानंतर रोजगार मिळाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले तर ते भीम पराक्रम करू शकतात. हे या जिल्ह्यातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट सर करून दाखवून दिले आहे.- सुधीर मुनगंटीवार,अर्थ, नियोजन व वनेमंत्री, महाराष्ट्र शासन.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे परिसरातील बेरोजगार तरुण कामाला लागले आहेत. चांगले प्रशिक्षण घेतले की हमखास नोकरी मिळते.-चंद्रकला बोबाटे, इटोली.चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग असले तरी बेरोजगारीही वाढली आहे. ती कमी करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले डायमंड कटींग सेंटर तरुणांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यांना यातून काम मिळत आहे.-हरीश गेडाम, बामणी (दुधोली).चंद्रपूरच्या एकलव्याची एव्हरेस्टवर स्वारीउपजत कलागुणांना संधी मिळाली की आकाश ठेंगणे होते, याचे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी जगापुढे मांडले आहे. चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा चंद्रपूरच्या पाच विद्यार्र्थ्यानी एव्हरेस्टवर पोहचवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासन यांनी राबवलेल्या मिशन शौर्य हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. ज्यांनी आयुष्यात कधी विमान बघितले नाही. या मिशनसाठी जवळपास वर्षभराची तयारी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केली होती. २०१८ च्या मे महिन्यात मुलांनी हा भीम पराक्रम केला. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील सक्षम, काटक, सुदृढ ५० विद्यार्थ्यापैकी दहा विद्यार्थ्यांची निवड एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर करण्यात आली. दहापैकी कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धीच्या या प्रयोगाला आता राज्यव्यापी अभियानाचे स्वरूप आले आहे. या मिशनमधून मिशन शक्तीचा उदय झाला आहे. क्रीडा, कला, उद्योग, प्रशासन क्षेत्रात आदिवासीबहुल जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व उमटावे यासाठीचा हा प्रयत्न राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नोंदवला गेला. प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात लाल किल्ल्यावरुन चंद्रपूरचा यासाठी गौरव केला.
डायमंड कटींग प्रशिक्षणातून बेरोजगारीवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 6:00 AM
विदर्भातून मोठ्या प्रमाणात सुरत व मुंबई या परिसरातील डायमंड कटींग अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तरुण काम करतात. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षणाची गरज असते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी आहे. किमान कौशल्य आवश्यकता असणाऱ्या या व्यवसायामध्ये हमखास २० ते ४० हजार रुपये प्रति महिना असा रोजगार मिळतो.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार म्हणतात, केंद्रामुळे हमखास नोकरीची संधी