बल्लारपूर : खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे धान पिकाची बीज प्रक्रिया मोहीम गावोगावी राबविण्यात येत आहे.
मृग नक्षत्राचा पाऊस जोरदार बरसल्याचे औचित्य साधून या कालावधीत विविध मोहीम राबविण्यात येत असून, बल्लारपूर तालुक्यातील मौजा मोहाडी तुकूम येथे धान पिकाच्या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये गावचे कृषिमित्र दिलखुश शरद सोयाम, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी व कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी सचिन शिवलाल कपूर यांच्या शेतावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले व ३ टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. तसेच बीज प्रक्रिया, उगवण क्षमता तसेच भात पद्धतीचे महत्त्व विशद केले व धान पिकावर येणारे विविध रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी बीज प्रक्रिया का महत्त्वाची आहे हे सांगण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सलामे, कृषी पर्यवेक्षक उमाकांत बोधे, श्रीकांत ठवरे, कृषी सहायक नीलेश इंगळे आणि गावातील शेतकरी यांची उपस्थिती होती.