चंद्रपूर : वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी कामगारांमध्ये फूट पाडण्याचा तसेच आंदोलन संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत कामगारांनी सोमवारी सकाळी सामान्य रुग्णालयासमोर एकत्र येत घोषणा देत निदर्शने केली. दरम्यान, कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास टोकाची भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी महिला कामगारांनी दिला.
थकीत पगाराच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कोरोनायोद्धा कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला चार महिने पूर्ण होत आहे. आंदोलनकर्त्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यात शासनाला अद्यापही यश आले नाही. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ५६२ कंत्राटी पदांसाठी मे २०२० मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, तब्बल एक वर्षानंतर केवळ २०७८ पदांना मंजुरी देऊन कंत्राटदाराला कामाचा आदेश देण्यात आला. २०७ कामगारांच्या नावांची यादी लावून कामगारांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शासन भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष, नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.