ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडीअंतर्गत येणाऱ्या रणमोचन गावात डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे. रुग्णाला गेल्या दोन दिवसांपासून गुडघे दुखणे, डोके दुखणे यासारखा त्रास होता. त्यांनी ब्रह्मपुरी येथील नामांकित खासगी डॉक्टरांकडे तपासणी केली असता चाचणी डेंग्यू सकारात्मक आली.
गावातील सांडपाणी वाहून न जाता साचून राहते. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने गावातील नाल्यांची स्वच्छता तसेच गावातील स्वच्छता करून सांडपाणी वाहून जाण्याकरिता मार्ग काढावा. अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात हा पहिलाच रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या फॉगिंग मशीन नादुरुस्त आहेत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाकडून उचित कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बॉक्स
आरोग्य विभागाचा चमू गावात दाखल
डेंग्यूचा रुग्ण रणमोचन गावात आढळताच गांगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय चमू गावात दाखल झाला. टाक्यांमध्ये, डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये प्रतिबंधात्मक औषधी टाकण्यात येत आहे. गावात ज्यांना साथीचे आजार असतील अशा व्यक्तींची रक्त तपासणी करून घेण्यात येत आहे.
कोट
सर्व ग्रामपंचायतींमध्ये ध्वनिप्रक्षेपकाद्वारे पंचायत समितीमार्फत जनजागृती करण्यात येईल. नादुरुस्त फॉगिंग मशीन दुरुस्त करण्यात येईल. सर्व ग्रामपंचायतींना तसे परिपत्रक देण्यात आले आहे.
- डॉ. शिरीष रामटेके, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, ब्रह्मपुरी
210821\img-20210821-wa0085.jpg
साचलेले पाणी काढून टाकताना आरोग्य विभागाचे कर्मचारी