खडसंगी : खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोनगाव (वन) व बंदर (शिवारपूर) गावात मागील काही दिवसांपासून डेंग्युसदृश तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी अंतर्गत सहा उपकेंद्रांमार्फत आरोग्य सेवा दिली जाते. त्यामध्ये चिमूर, शेडेगाव, खडसंगी, बोथली, भान्सुली या आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या उपकेंद्रातील काही गावांमध्ये पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे व वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने सोनगाव (वन) व बंदर (शिवारपूर) गावात मागील काही दिवसांपासून बऱ्याच रुग्णांना तापाने ग्रासले आहे. बंदर येथील श्रुती राजू श्रीरामे (१२) या मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे उपचार करुन प्रकृतीत सुधारणा न झाल्याने नागपूर येथे हलविण्यात आले. तर कपील बाळकृष्ण रामटेके (२०) यांना चंद्रपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. बरेच रुग्ण चिमूर, खडसंगी येथील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. याच प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (वन) गावात सुद्धा तापाची साथ पसरली आहे. गावातील साधारणत: ४० ते ५० टक्के रुग्ण तापाने फणफणत असून बरेच रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेत आहेत. यामध्ये संभा किसन रणदिवे, लीलाबाई नन्नावरे, मोहन बाळकृष्ण जांभुळे, राम मुर्लीधर गायकवाड यांना तापाने ग्रासले असून मंगळवारला आरोग्य केंद्रास सुट्टी असल्याने या सर्व रुग्णांनी खाजगी दवाखान्यातून उपचार घेतला. तर सोनु मारोती नन्नावरे (८) याची प्रकृती जास्त खालावल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना साधा ताप असला तरी डेंग्यू तर नाही ना, या भीतीने ग्रासले आहे. बंदर (शिवापूर) या गावातसुद्धा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे या दोन्ही गावात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना करुन आरोग्य कॅम्प लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
सोनेगाव, बंदर गावात डेंग्युसदृश साथ
By admin | Published: August 27, 2014 11:24 PM