अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धरणे : आजपासून करणार लेखणीबंद आंदोलनचंद्रपूर : प्रलंबित विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. यात मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याने कृषी विभागाची कामे प्रभावित झालीत.मंगळवारपासून लेखणीबंद आंदोलनास सुरुवात होणार असल्याने गुणनियंत्रण, खते, किटकनाशक आणि साहित्य वाटपही रखडले आहे. जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी या पदास राज्य संवर्गात समाविष्ट करणे, विस्तार अधिकारी यांची सेवाज्येष्ठता विस्तार अधिकारी याप्रमाणे विभागीय पातळीवर नेमणे, जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी यांच्या रोखण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन मधील पदोन्नती तातडीने देणे, कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे या मागण्यांचा गेल्या कित्येक महिन्यांपासून शासनस्तरावर पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अजूनही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी उगारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर आंदोलनास सुरुवात झाली. मंगळवापासून लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन हटवार यांनी दिली. धरणे आंदोलनात संजय कांबळे, नरेंद्र पेटकर, नितीन ढवस, निलेश भोयर, सुशांत गाडेवार, प्रकाश भक्ते, लक्ष्मीनारायण दोडके, गजानन ढवस, रवी राठोड आदींचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कृषी विभागाच्या कामांना ‘ब्रेक’
By admin | Published: October 04, 2016 12:42 AM