चंद्रपूर : शहरात वारंवार उद्भवणाऱ्या इरई नदीच्या पूरपरिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पूर संरक्षक भिंत बांधकामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. हा सुधारित प्रस्ताव ४९ कोटी ३४ लाखांचा आहे. मदत व पुनर्वसन विभागाने अंतिम मान्यता दिल्यास प्रश्न मार्गी लागू शकतो.
चंद्रपूरच्या पश्चिमेला वाहणाऱ्या इरई नदीकाठाजवळील परिसरात कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी सखल भागात शिरते. २००६, २०१३ व २०२२ तसेच यंदाही पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेकडो घरांचे नुकसान होऊन वित्तहानी झाली. राज्य शासनानेही पूरसंरक्षण भिंत बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्याबाबतचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला. पडोली पूल ते चौराळा पुलाचे अंतर ७ किमी असून, नदीच्या समांतर डाव्या बाजूला चंद्रपूरची लोकवस्ती आहे. या संपूर्ण लांबीमध्ये पूर संरक्षक भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे.
प्रस्तावाची सद्यस्थिती
इरई नदी पूरसंरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती, चंद्रपूर यांच्या सभेत शासनातर्फे निर्देश दिल्यानुसार प्राधिकरणाची मान्यता घेण्यात आली. २३ डिसेंबर २०२२ रोजी २४ कोटी ९४ लाख १३ हजार ३७ रुपये या रकमेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आला. त्यानंतर सुधारित ४९ कोटी ३४ लाख १९ हजार ९०८ रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तो शासनाला सादर करण्यात आला आहे.
''इरई पूरसंरक्षक भिंतीसाठी मदत व पुनर्वसन विभागानेही या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे हिवाळी अधिवेशनादरम्यान केली. जलसंपदा विभागाने सादर केलेल्या इरई नदी पूरसरंक्षक भिंतीच्या बांधकाम प्रस्तावाला तत्काळ मंजुरी प्रदान केल्यास चंद्रपूरकरांची मोठी अडचण दूर होऊ शकते. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे."
- किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर